जेलर ते प्राध्यापक - मनोगत

बर्‍याच दिवसांपासून लिहायचं म्हणतोय, पण बऱ्याचदा लिहायचं टाळतोय. पण मनातील ही घुसमट शांत बसू देत नाही. म्हणून आपल्याबद्दल, आपल्या प्रवासाबद्दल, प्रवासात भेटलेल्या माणसांबद्दल, प्रवासातील खच-खळग्यांबद्दल, चढ-उताराबद्दल, यश-अपयशाबद्दल, मान-अपमानाबद्दल अशा सगळ्या गोष्टींबद्दल लिहितोय. कदाचित हा प्रवास ऐकून  कुणालातरी प्रेरणा मिळेल. कोणीतरी  फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उंच भरारी घेईल. तसं पाहिलं तर माझ आस्तित्व शून्य  आहे. पण असं म्हणतात की,  शून्याला पण किंमत असते. योग्य वेळी, योग्य ठिकाणी शून्याचा वापर केला तर शून्याला महत्त्व प्राप्त होते. फक्त त्या शून्याच्या मागे कोणीतरी उभे राहायला हवे. माझ्या शुन्य अस्तित्वाला किंमत प्राप्त होण्यासाठी, माझ्यामागेही अशीच अनेक देवमाणसे  उभी राहिली. त्यामुळेच माझ्यातील शून्य अस्तित्वाला किंमत प्राप्त झाली. आणि मी जेलर ते प्राध्यापक असा असामान्यत्वाचा प्रवास करू शकलो. त्या प्रवासाबद्दल...